सासू आणि नवऱ्याच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जागृती बारी (24) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती आणि सासू यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांची चौकशी सुरु आहे.
भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील गजानन भिका वराडे यांनी आपली मुलगी जागृतीचा विवाह 20 एप्रिल 2024 रोजी पिंप्राळा (जळगाव) येथील सागर रामलाल बारी याच्यासोबत केला होता. सागर हा मुंबई पोलीस असल्याने तो विवाहानंतर 21 जूनला कल्याणमध्ये राहण्यासाठी घेऊन जाणार होता. त्यापूर्वी आई-वडील लेक जागृतीला भेटायला गेले, तेव्हा मुंबईमध्ये घर घेण्यासाठी 10 लाख रुपये देण्याची मागणी बारी कुटुंबाने केली. मात्र मुलीच्या वडिलांनी असमर्थता दर्शवत काही काळाने जमेल तसे पैसे देऊ असं सांगितलं.
लग्नानंतर दोन महिन्यांनी जागृती डोंबिवलीतील मानपाडा परिसरातील आडीवली ढोकळी भागात एकविरा आई अपार्टमेंट येथे सागरच्या घरी राहण्यास आली. मात्र सागर आणि त्याच्या आईकडून तिचा हुंड्यासाठी सतत छळ केला जायचा. 5 जुलैला जागृतीचा पती सागरने तिचा भाऊ विशालला फोन केला आणि त्याने तुझ्या बहिणीने घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतला, असे सांगितलं.
शारिरिक आणि मानसिक छळ
जागृतीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यावेळी जागृतीच्या आईने पोलिसांनी तिच्यासोबत शेवटचं काय बोलणं झालं या याबद्दलही सांगितलं. ‘आई माझी सासू मला तू काळी आहेस, तुझे ओठ काळे आहेत, तोंडाचा घाण वास येतो असे सारखी हिणवत असते. तसेच तू माझ्या मुलाला पसंत नाही. घरातून निघून जा. नाहीतर आईकडून घर घेण्यासाठी 10 लाख रुपये घेऊन ये. माझा शारिरिक आणि मानसिक छळ करते, तू त्यांच्याशी बोलून घे’, असे जागृतीने तिच्या आईला सांगितले होते.
सुसाईड नोट
डोंबिवलीमध्ये आल्यानंतर अवघ्या 13 दिवसांमध्येच जागृतीने टोकाचं पाऊल उचललं, त्याआधी तिने मोबाईलमध्ये सुसाईड नोटही लिहिली होती. मोबाईल लॉक असल्यामुळे सागरला तो लॉक ओपन करता आला नाही. यानंतर पोलिसांनी जागृतीचा मोबाईल ताब्यात घेतला. जागृतीच्या बहिणीने लॉक पॅटर्न सांगितल्यानंतर पोलिसांना ती सुसाईड नोट सापडली. ज्यात जागृतीने आत्महत्येला सासू आणि नवऱ्याला जबाबदार धरलं आहे. या आधारे मानपाडा पोलिसांनी जागृतीचा नवरा आणि सासूवर गुन्हा दाखल केला आहे.