Chhagan Bhujbal : शरद पवार यांनी अद्याप घेतलेली नाही भुजबळ यांची भेट; तासाभरापासून भुजबळ हे वेटिंगवरच…

Chhagan Bhujbal : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन १४ रोजी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर छगन भुजबळ हे आज सकाळी अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे पोहोचले आहेत. गेल्या तासाभरापासून ते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी असून शरद पवार यांनी अद्याप त्यांची भेट घेतलेली नाही. मात्र भुजबळांच्या या कृतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून सगळ्यांचेच या भेटीकडे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणामुळे चर्चेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांची तब्येत ठिक नाहीये. ते कोणाचीही भेट घेत नाहीयेत. तरीदेखील भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत.

काही दिवसांपूर्वी भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे, असे भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तर नाही ना ? असे आता विचारले जात आहे.

काय म्हणाल्या विद्या चव्हाण ?
“छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला आल्याच मला तुमच्या चॅनलवरुन कळलं. अनेक जण पवारांच्या भेटीला येत असतात, भुजबळ बाहेर आल्यावरच नेमकं काय ते समजू शकतं. सध्या, तरी कळायला मार्ग नाही. सुनील तटकरे, अजित पवार हे मोठे नेते शरद पवारांवर टीका करायच टाळतात. त्यांना काही बोलायच असेल, तर भुजबळांकडून बोलवून घेतात लोकसभेपासून छगन भुजबळ नाराज दिसतायत. त्यांच्याकडून टीका करुन घेतली जाते का ? असा मला प्रश्न पडतो. अनेक लोक शरद पवारांना भेटायला येतात, तसेच भुजबळ भेटायला आले असतील” असं विद्या चव्हाण म्हणाल्या.

सध्या राज्यासमोर ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, संवादाची दरी मिटवण्यासाठी ही भेट आहे का? यावर विद्या चव्हाण म्हणाल्या की, “मंडल आयोगाच 27 टक्के आरक्षण पवार साहेबांच्यावेळी पहिलं महाराष्ट्रात लागू झालं. ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. आरक्षणाची मर्यादा 50 टक्केच्या वर वाढवण्यासाठी संसदेत गेलं पाहिजे. मुख्यमंत्री शिंदे दाखवतायत की, ते आरक्षणाचा पेच सोडवण्याचा प्रयत्न करतायत. पण मिटिंगला जाऊन वेळ वाया घालवण्यात काय उपयोग?. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी”