Chhagan Bhujbal : अंजली दमानियांच्या आरोपांना छगन भुजबळ यांचं एकाच वाक्यात उत्तर, काय म्हणाले?

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील चौकशीचं काय झालं?, असा सवाल समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या टीकेला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अंजली दमानिया यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या संस्थांशी संबंधित गैरव्यवहारांची चौकशी कधी सुरू होणार? भुजबळांवरील आरोपांच्या चौकशीचं पुढे काय झालं? विधिमंडळात दिलेल्या आश्वासनांनुसार या संदर्भातील फेरविचार याचिका महाराष्ट्र सरकार कधी दाखल करणार? अशी विचारणा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

अंजली दमानिया यांनी सांगितले की, छगन भुजबळ यांच्या विरोधात 2013 मध्ये जी आम्ही तक्रार दाखल केली होती. त्याच्यानंतर त्यांना अटक झाली. बरीच वर्षे ते जेलमध्ये पण होते. देशपांडेच्या मॅटरमध्ये त्याच न्यायाधिशांनी म्हटलं होतं की, आम्हाला कुणालाही सोडता येणार नाही आणि भुजबळ यांना मात्र डिस्चार्ज मिळाला. अँटी करप्शन ब्युरोनंतर हे प्रकरण हायकोर्टात जायला हवं होतं. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

दरम्यान, त्यांच्या या आरोपांना आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. चौकशी कसली करता मला काही माहिती नाही. महाराष्ट्र सदन केसमधून आम्ही डीचार्ज झालो. त्यांनी कसली मागणी केली आहे त्याची मला काही कल्पना नाही. मुंबईच्या चारिटेबल ट्रस्टची कुठलीच केस नाही. जी आहे ती चॅरेटीकडे आहे. पूर्वीचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी केलेली केस आहे, असं म्हणत छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे.