Chhagan Bhujbal : दारू पिऊन पिऊन जरांगेंच्या किडन्या किडल्या; मनोज जरांगे काय म्हणाले ?

दारू पिऊन पिऊन जरांगे- पाटील यांच्या किडन्या किडल्या असल्याची बोचरी टीका छगन भुजबळ यांनी केली होती. आता या टीकेला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांनी प्रत्युत्तर दिले असून, छगन भुजबळ यांना थेट आव्हान दिले आहे.

जन्मापासून आतापर्यंत दारूचा थेंब जरी घेतला असला. किंवा माझ्या शरीराला दारूचा स्पर्श जरी झाला असेल तर मी जिवंत समाधी घेईन, नाहीतर त्यांनी तरी समाधी घ्यावी, मी नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहे, असे आव्हान मनोज जरांगे -पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिले.

ते पुढे म्हणाले की, भुजबळ यांचे ऐकून धनगर, वंजारी बांधवांनी आम्हाशी भांडू नये, आमची नाराजी अंगावर घेऊ नये. मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागे शरद पवारच कारणीभूत असल्याचा आरोप देवेंद्र फडणीस यांनी केला होता. यावर जरांगे पाटील म्हणाले की, आतापर्यंत आम्हाला आरक्षण न मिळण्यामागे सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते तितकेच जबाबदार आहेत. आतापर्यंत आम्ही त्यांना मोठे केले. परंतु, त्यांनी समाजासाठी काहीही केले नाही. मराठ्यांच्या आतापर्यंत ७२ लाख नोंदी सापडल्या आहेत. असा दावाही जरांगे यांनी यावेळी केला.

अंतरवाली सराटीतील उपोषण सोडताना मंत्रीमंडळाचे शिष्टमंडळ आणि कायदेतज्ञ यांनी आरक्षणासंर्भात लेखी घेतलेले मुद्दे, मिळालेल्या नोंदी आणि शिंदे समितीचा अहवाल स्वीकारल्यावर आरक्षण देण्यासंदर्भात कायदा पारित करून आरक्षण देणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पळून त्यावर प्रामाणिक राहतील, असा आम्हाला विश्वास आहे.

शिंदे समितीने आपले काम केले आहे. आता सरकारने आपले काम करावे, आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा पारीत करावा. आरक्षणाचा कायदा झाला तरी शिंदे समितीचे काम पुढे सुरू ठेवावे, अशी मागणी जरांगे -पाटील यांनी यावेळी केली.