मुंबई : मराठा समाजाला नव्हे झुंडशाहीला माझा विरोध आहे. सर्व समाज घटकांना समान न्याय द्या. आपण गादीचे वंशज आहात. असं मंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजीराजेंना आवाहन केले आहे. मराठा आरक्षण देण्यास आपला विरोध नाही. परंतु मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देता येत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे ओबीसीतून मराठा समाजास आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. असं भुजबळ म्हणाले आहेत.
छगन भुजबळ म्हणाले, “शिंदे समितीचे काम संपले आहे. आता ही समिती बरखास्त करा. मराठवाडा हा निजामांकडे होता. त्यामुळे मराठवाड्यातील लोकांनी मागणी केली की आम्ही मागसवर्गीय आहे. पण आमची कागदपत्रे तेलंगणात आहे. आता तेथील कागदपत्रे तपासली गेली. हा विषय फक्त मराठवाड्यापुरता होता. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हे काम करण्याची गरज नाही. आता राज्यात कुणबीसंदर्भात खोटे प्रमाणपत्र तयार केले जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. यामुळे शिंदे समितीचे काम आता संपले आहे. समिती बरखास्त करण्यात यावी.”
“माझ्यावर हल्ले झाले त्यापेक्षा पोलिसांवर हल्ले झाले, हे महत्वाचे आहे. महिला पोलीस जखमी झाल्या. सध्या पोलीस हतबल झाले आहेत. कारण जखमी झाल्यावर कारवाई पोलिसांवरच करण्यात आली. यामुळे राज्यात पोलीसच सुरक्षित नसतील तर इतरांचे काय? यामुळे आता पोलिसांना विश्वास देणे गरजेचे आहे. तुम्ही तुमचे काम करा, असे पोलिसांना सांगणे गरजेचे आहे. बीडमध्ये पोलिसांवर हल्ला कसा झाला, हे तपासण्याची गरज आहे. जनतेपुढे पहिली बाजू आली नाही. त्याला पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्री जबाबदार आहे. संभाजी महाराज यांच्यासंदर्भात आपणास मोठा आदर आहे. त्यांचा पूर्ण महाराष्ट्र आहे. एखाद्या घटकाकडे त्यांनी पाहू नये, अशी आपली हात जोडून त्यांना विनंती आहे.” असं भुजबळ म्हणाले आहेत.