पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात जात स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. छगन भुजबळ यांनी जरा सबुरीने घ्यावं. अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा स्वराज्य संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे. वेळ पडली तर छगन भुजबळ यांची गाडी इथे ही गाडीही फुटू शकते, अशी धमकीही देण्यात आली आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी आणि ओबीसी हक्कांसाठी छगन भुजबळ हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. आधी जालन्यात आणि काल हिंगोलीत त्यांनी ओबीसी एल्गार महासभा घेतल्या. त्यानंतर मराठा समाज छगन भुजबळांना कडाडून विरोध करत आहे.
स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. वेळ पडली तर छगन भुजबळ यांची गाडी इथे ही गाडीही फुटू शकते. ओबीसी नेत्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या आरक्षणाला नख लावू नये. छगन भुजबळ हे वारंवार वक्तव्य करून दोन समाजांमद्ये वाद लावत आहेत. त्यांनी हे वेळीच थांबवावं, असं म्हणत स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं हे ओबीसी समाजावर अन्याय करणारं असल्याचं छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी जालना आणि हिंगोलीत दोन ओबीसी एल्गार महासभा घेतल्या. यातून त्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही त्यांनी घणघाती टीका केली.