सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलाय का?, ७० पोलीस काय पाय घसरून पडले का?

जालना : ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे. यासाठी ओबीसी समाज एकवटला असून जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करत मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला. परिषदेला विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर उपस्थित आहेत. यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबासीमधून आरक्षण देण्यावर आपली रोखठोक भूमिका मांडली.

स्वकष्टाचे खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही

भुजबळ म्हणाले, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसीतून आरक्षण देऊ नये. 56 मराठा मोर्चे निघाले पण आम्ही कुणाला विरोध केला. मात्र आम्ही कुणाचं घरं, दारं जाळली नाहीत. ओबीसी आरक्षण घटनेनुसार आहे. ओबीसी आरक्षण म्हणजे गरीबी हटाव नाही. ओबीसीत सर्व जाती कायद्याने आल्या. तेव्हा आम्ही विरोध केला नाही. मात्र मराठा समाज अवैधरीत्या ओबीसी समाजात घुसतो आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल करत “हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही”, असे छगन भुजबळ म्हणाले.

महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलाय का?

भुजबळांनी राजकीय नेत्यांना, मंत्र्यांना गावबंदी केली त्यावर भुजबळांवर भूमिका मांडली. भुजबळ म्हणाले, “काय चाललंय आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी! काय महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिलाय काय रे? तुम्ही मेसेज करता आमचा बोर्ड फाडला मग तुमचे हात कुठे गेले? जशास तसं उत्तर द्यावं लागेल. मी सांगितलं ‘करेंगे या मरेंगे’ हा तुमचा पाहुणा म्हणतो हा हिंसाचार आहे. पण हे तर महात्मा गांधींचं वाक्य आहे. पण जरांगे तर म्हणतात की, ‘लढेंगे और जितेंगे…’वारे वारे वा”

माझं पोलिसांना आवाहन आहे की, हे गावागावात लावलेले गावबंदीचे फलक ताबडतोब हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचं राज्य आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना माझं सांगण आहे. आज आमदार, राजकीय नेते गावात यायचं नाही हे दोनचार मुलं काहीतरी लावतात आणि धांदल करतात. हे असं यापुढं चालणार नाही. सरकार आहे की नाही? कायदा आहे की नाही? तुम्ही जर असा पक्षपातीपणा कराल तर ओबीसी देखील गप्प बसणार नाही. ओबीसींच्या जोडीला दलित-मुस्लीम-आदिवासी सर्व एकवटल्याशिवाय राहणार नाही. पण ही दादागिरी बंद करु, असंही यावेळी भुजबळ म्हणाले.

७० पोलीस काय पाय घसरून पडले का?

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ‘उपोषण केलं. काय झालं पोलिसांचा लाठीचार्ज झाला. पोलिसांचा लाठीचार्ज सर्वांनी पाहिला. महिला पोलिसांसह ७० पोलिस रूग्णालयात अॅडमिट झाले. दगडांचा मार खाऊन जखमी झाले. पोलीस त्यांना उठवायला गेले तेव्हा ते म्हणाले, मी झोपलोय नंतर या ते पुन्हा येईपर्यंत त्यांनी सर्व तयारी करून ठेवली. तिथे महिला देखील होत्या त्यामुळे महिला पोलीस देखील तिथे आल्या होत्या.’

‘पोलिसांनी जशी विनंती केली चला, तुमची तब्येत खूप वाईट आहे. आता रूग्णालयात गेलं पाहिजे. त्याचवेळी दगडाचा मारा सुरू झाला, पोलीस पटापट जमिनीवर पडले. ७० पोलीस काय पाय घसरून पडले का? कोणी मारलं त्यांना रूग्णालयात रेकॉर्ड आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी मोघलांच्या सूनांना देखील आई म्हणून परत पाठवलं आणि तुम्ही आमच्या पोलिसांच्या अंगावर गेलात. लाज कशी नाही वाटली तुम्हाला. हे सर्व झाल्यानंतर म्हणाले की, पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांची बाजू आलीच नाही, एकच आले पोलिसांनी हल्ला केला’ असंही पुढे भुजबळ म्हणाले.