मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एल्गार पुकारला आहे. छगन भुजबळांच्या भुमिकेमुळे मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. फेसबुकवर पोस्ट लिहीत संभाजीराजे यांनी ही मागणी केली आहे.
फेसबुक पोस्ट मध्ये संभाजी राजे यांनी म्हटले आहे की, छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी.
छत्रपती संभाजीराजे आज राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची भेट घेणार आहेत. आयोगाच्या कार्यालयात ही भेट होणार आहे. आधी मागासवर्गीय आयोगात जाऊन संभाजीराजे भेट घेणार आहेत. नवीन प्रशासकीय इमारतीत आयोगाचं कार्यालय आहे. तिथं ही भेट होईल. नंतर मागासवर्ग आयोगाची पुण्यातील व्हीआयपी सर्किट हाऊसला बैठक होणार आहे.
छगन भुजबळांची पोलीस महासंचालकाकडे तक्रार करणार आहे. छगन भुजबळांची पोलीस चौकशी करा. बीडची जाळपोळ ही छगन भुजबळांनी करायला लावली. त्यांनी मराठा समाजसाठी बदनामीचा कट रचला आहे. त्यांची नार्को टेस्ट करा आणि गुन्हा दाखल करा, अशी मागणी मराठा समन्वयक योगेश केदार हे पोलीस महासंचलकाकडे करणार आहेत.