उण्या पुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या. आदिलशाही, मोगल इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी… असे बलाढ्य शत्रू अंगावर घेतले. या सर्वांना पुरून उरत शिवरायांनी हिंदवी स्वराज्य उभारले. आक्रांतांनी ज्यांना लुटारू आणि बंडखोर म्हटलं तेच सिंहासनाधीश्वर झाले. चक्रवर्ती सम्राट झाले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती झाले.
शिवाजी महाराजांच्या या देदीप्यमान यशामागे त्यांचे युद्ध तंत्र हा महत्त्वाचा घटक ठरतो. थोडेसे सैन्य आणि अत्यंत तुटपुंज्या साधन सामग्रीसह महाबलाढ्य शत्रूंचा आणि चतुरंग सेनेचा पराभव कसा करता येतो ते शिवाजीराजांनी दाखवून दिले. ती युद्ध आता इतिहासाच्या पटावर नेहमी करता कोरली गेलेली आहेत. जगभरातील सैन्य प्रशिक्षण केंद्रात शिवाजीराजांनी लढलेल्या निवडक युद्धांचे प्रशिक्षण दिले जाते. अफजल खान वधाचे युद्ध, ही यातील महत्त्वाची लढाई आहे. अफजल खान जेव्हा शिवाजी महाराजांना समाप्त करण्याच्या हेतूने विजापूरहून निघाला तेव्हा स्वराज्य लहान होते. आजच्या हिशोबाने अडीच – तीन जिल्ह्यांचा तो प्रदेश असावा. त्या लहानशा राज्यावर महाबलाढ्य असा अफजल खान चालून येतोय म्हटल्यावर ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्णय स्पष्ट होता. नुकतंच स्थापन झालेलं कोवळ्या पोरांचं कोवळं स्वराज्य पार चिरडले जाणार ही आदिलशाही, मोगल, इंग्रज इत्यादी सर्वांचीच खात्री होती.
खानाला आपलं शक्तिस्थान माहिती होतं. प्रचंड सैन्य असल्याने मैदानात युद्ध. मात्र त्याचबरोबर शिवाजी महाराजांनाही आपली शक्ती कुठे एकवटलीय हे माहीत होतं. जंगलात, डोंगरावर युद्ध झालं तरच शक्यता होती. अन्यथा मैदानी युद्धात पराभव अटळ होता. म्हणूनच खानाने कितीही चिथावलं तरी शिवाजी राजांनी संयम पाळला. विजापूरहून निघून खान तुळजापूरला आला. महाराष्ट्राच्या कुलदैवतेचे मंदिर त्यानं फोडलं. ध्वस्त केलं. आता तरी चवताळून शिवाजी मोकळ्या मैदानात येईल असं त्याला वाटलं होतं. अनेक मराठा सरदारांनीही याप्रसंगी शिवाजी राजांच्या शांत बसण्याच्या स्वभावावर टीकास्त्र सोडलं. शिवाजीराजे घाबरले असं समजून अनेक मराठा सरदार अफजल खानाला सामील झाले. पण राजे आपल्या युद्धतंत्राप्रमाणे चाल खेळत होते. त्यांना कसेही करून खानाला जावळीच्या जंगलात आणायचं होतं.
जून १६५९ पासून ते नोव्हेंबर १६५९ पर्यंत खान आपल्या शौर्याचे पुरावे देत, मंदिरांना उध्वस्त करत, गावंच्या गाव बेचिराख करत चालला होता. मात्र शिवाजी राजे संयम धारण करून त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणण्याचे सर्व प्रयत्न करत होते. त्यांच्या युद्धतंत्राचा हा फार मोठा भाग होता. शेवटी ‘सिवा डर गया’, असं समजून अफजल खान शिवाजी राजांच्या भेटीला प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. दिवस ठरला १० नोव्हेंबर १६५९. जुन्या जुलियन कॅलेंडर प्रमाणे वार होता गुरुवार, आणि तिथी होती मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी. अर्थात चंपाषष्ठी. दुपारी साधारण दोन वाजता महाराजांनी अफजलखानाला मारला. त्याचा कोथळा बाहेर काढला. साधारणपणे आपले प्रतापगडाचे युद्ध किंवा अफजल खान वधाची कथा इथेच संपते.
पण महाराजांच्या युद्धतंत्रात हे बसत नव्हतं. अफजल खानाला मारून तर त्यांची कथा सुरू होणार होती.अफजल खान मारला जाणार हे निश्चित होतं. त्या गृहीतकावरच महाराजांनी आपली पुढची योजना आखली होती. सरप्राईज अटॅक हे या योजनेचा मुख्य सूत्र होतं. १० नोव्हेंबरच्या दुपारी खानाला मारून राजे गडावर पोहोचले. आपले रक्ताळलेले कपडे त्यांनी बदलले. खानाला मारल्याबरोबर इशारतीची तोफ झाल्यामुळे खानाच्या गोटात आणि जावळीच्या जंगलात अक्षरशः रणकंदन माजलं होतं. होऊ घातलेल्या विजयाच्या मस्तीत सुस्त असलेल्या खानाच्या फौजेला शिवरायांचे मावळे अक्षरशः कापून काढत होते. इकडे प्रतापगडावर सायंकाळी राजांनी लहानसा दरबार भरवला. जे गडावर होते त्यापैकी ज्यांनी विशिष्ट कामगिरी केली त्यांचा सन्मान केला. जासुदां कडून एकूण घटनेचा आढावा घेतला आणि गडावरच्या मोजक्या सैन्यानिशी रात्रीच्या पहिल्या प्रहरास महाराज गड उतरले. त्यांनी रात्री गडावर विश्रांती देखील घेतली नाही. दुसऱ्या दिवशी ११ नोव्हेंबरला महाराज वाईत होते. तिथेच नेतोजी पालकर ही पोहोचले. वाईतील समाचार घेऊन खानाच्या सैन्यातून मिळालेला खजिना बघून आणि जखमी सैन्याची व्यवस्था लावून महाराजांनी आपल्या लहानशा सैन्याचे तीन भाग केले.
काही सैन्य त्यांनी दोरोजीला दिले. दाभोळच्या बंदरात खजिन्याने भरलेली अफजलखानाची तीन जहाज नांगरलेली आहेत याची पक्की खबर राजांना होती. दोरोजीनी त्या तीन जहाजांवरील माल घेऊन कोकणात मजल मारावी ही योजना होती. नेतोजीला त्यांनी सरळ विजापूर वर आक्रमण करण्यास सांगितले. अन स्वतः एक लहानसे सैन्य घेऊन महाराज दक्षिणेच्या दिशेने निघाले. अक्षरशः शिवशंकराचा हा त्रिशूल विजापूरकर आदिलशाहीला ध्वस्त करण्यासाठी निघाला होता. दोरोजी ने आसपास चे ठाणे घेत दाभोळ गाठले. दाभोळ जिंकले. मात्र अफजलखानाच्या माणसांना या धाडीचा सुगावा लागल्याने त्यांनी दोन जहाज राजापूरकडे वळवली. दरोजीही आवेशानं राजापूरच्या दिशेने निघाला. इकडे नेतोजी पालकर प्रचंड आत्मविश्वासासह कुठेही न थांबता विजापूरच्या दिशेने घोडदौड करत निघाले होते. रस्त्याने मिळतील ती आदिलशाही ठाणे लुटत चालले होते. मराठ्यांचे असे आक्रमण येईल याची आदिलशाहीने कल्पनाच केलेली नव्हती. त्या सर्वांना वाटत होते आतापर्यंत अफजलखानाने शिवाजीला संपवले असेल.
साधारण दहाव्या दिवशी नेतोजी खुद्द विजापूरच्या काही कोसापर्यंत येऊन पोहोचले होते. विजापुरात प्रचंड घबराट उडालेली होती. असलेली सर्व फौज वेशींवर उभी केली होती. अफजलखानाला मारल्याची बातमी चार दिवसांपूर्वीच त्यांना मिळालेली होती. त्यामुळे मराठे आता आदिलशाही संपवतात की काय अशी धास्ती त्यांना लागून राहिली होती. दुर्दैवानं नेतोजी बरोबर फक्त अडीच तीन हजारांची सेना होती. इतक्या लहानशा सैन्याला घेऊन विजापूरचा पाडाव करणे शक्य नव्हतं. नेतोजी जवळ त्यावेळी जर जास्त फौज असती तर विजयाच्या त्या वादळात विजापूरवर ताबा घेऊन मराठ्यांनी आदिलशाही संपवली देखील असती.
इकडे महाराजांचा झंझावात दक्षिण दिशेने निघाला होता. सरप्राईज अटॅक ची त्यांची योजना चांगलीच यशस्वी होत होती. अक्षरशः कुठेही विश्रांती न घेता महाराज एक – एक गाव घेत पुढे जात होते. खटाव, मायणी, रामपूर, कलेढोण, वाळवे, हलजयंतीका, आष्टी, अष्टे, वडगाव, वेळापूर, औदुंबर, मसूर, कऱ्हाड, सुपे, तांबे पाली, नेरले, कामेरी, विसापूर, सावे, उरण, कोळे आणि कोल्हापूर ही गावं महाराजांच्या ताब्यात आली. महाराजांच्या या वादळी झंजावातनं सातारा, चंदन, वंदन, विशाळगड, पालगड, रांगणा, प्रसिद्ध गड, भीमगड, पारगड आणि वसंतगड हे किल्ले देखील जिंकले. आणि २८ नोव्हेंबर १६५९ ला त्यांनी बलाढ्य असता पर्णाल दुर्ग अर्थात पन्हाळगड जिंकला.
अफजलखानाला मारल्याच्या फक्त १८ दिवसात महाराजांनी हे सर्व केलेलं आहे. १० नोव्हेंबरच्या दुपारी दोन वाजता स्वराज्याचा विस्तार जितका होता तो २८ नोव्हेंबरला दुपटीहून जास्त झाला होता. याशिवाय प्रचंड मोठा खजिना, ५००० घोडी, अनेक हत्ती स्वराज्याला मिळालेले होते. १० नोव्हेंबर च्या दुपारपर्यंत जे स्वराज्य राहील का जाईल, असं अनेकांना वाटत होतं, तेच स्वराज्य, आलेल्या महाप्रचंड अश्या संकटाला तोंड देऊन, त्याला परास्त करून, अत्यंत अभिमानानं आणि डौलानं विस्तारीत होऊन, शक्तिशाली बनून उभं होतं..!
संकटांचे संधीत रूपांतर करण्याचं यापेक्षा चांगलं उदाहरण जगाच्या इतिहासात कोठेही सापडत नाही. (क्रमशः)
– प्रशांत पोळ