मुंबई : गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या वाढलेल्या भेटीगाठी आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली तयारी, त्यांची पुढची दिशा स्पष्ट करणारी आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असे दिसत आहे. हे पहाता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उमेदवारांचा पराभव करण्यासाठी राज ठाकरे यांना भाजपाकडून पडद्याआड सपोर्ट केला जाईल, अशी चर्चा असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चक्क मनसेच्या कार्यालयात हजेरी लावली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध ठिकाणी जाऊन गुढीपाडवा निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांमध्ये सहभागी होत आहे. मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी डोंबवलीतील शोभायात्रेत हजेरी लावली. सदर कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि स्थानिक मनसेचे आमदार राजू पाटील देखील उपस्थित होते. सदर कार्यक्रम झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील मनसेच्या शाखेला देखील भेट दिली.
यावेळी राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करत स्वागत केले. सदर भेटीबाबत माहिती देताना राजू पाटील म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांना विनंती केली, साहेब…ऑफिस बाजूलाच आहे, तुम्ही येता का?, यावर एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता हो चालेल, असं म्हणत होकार दिला, अशी माहिती राजू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान, आपल्याला जे काही बोलायचे आहे ते आपण २२ मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क वरून बोलू, असे सांगत राज ठाकरे यांनी एका नव्या चर्चेला सुरुवात करून दिली आहे. दरवर्षी दसर्याला उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतो. गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांची जाहीर सभा त्याच शिवाजी पार्कवर होते. गुडीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे कोणत्या दिशेने गुढी उभारणार? हा राज्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते यांना पडलेला प्रश्न आहे.