मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरीत्या या सुट्टीबाबतची माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन कर्मचार्यांना ते त्यांच्या गावी सातार्याला जात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ ते २६ एप्रिल दरम्यान तीन दिवस सुट्टीवर असल्याची माहिती आहे.
३ दिवसांच्या सु्ट्टीत शिंदे त्यांच्या मुळ गावी सातार्याला गेले असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे राज्यात राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सुट्टीवर गेल्यामुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्याही भूवय्या उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे नेमक्या कोणत्या कारणास्तव तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर जाण्याची अनेक कारणे चर्चेत आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर निकाल लवकरच येणार आहे. या निकालावर अनेक गोष्टी निर्भर आहेत. जर निकाल एकनाथ शिंदे यांच्याविरोधात लागला तर शिंदे गटासाठी मोठा धक्का असणार आहे. तर निकाल आपल्याच बाजूने लागावा यासाठी देखील शिंदे देवाला साकडं घालण्यासाठी गेल्याच्या चर्चा सुरू आहेत.