ठरलं! मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात काढणार ‘धनुष्यबाण यात्रा’

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यापासून राज्याचं राजकीय वर्तुळ प्रचंड तापलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याचा निर्णय घेऊन, शिंदे-फडणवीस सरकारपुढे आव्हान निर्माण केले आहे. २ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून या सभेला सुरवात होणार आहे.  मात्र, महाविकास आघाडीच्या याच सभांना उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहेत. कारण, छत्रपती संभाजीनगरमध्ये २ एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात ‘धनुष्यबाण यात्रा’ काढणार आहेत.

दरम्यान, जिथे जिथे उद्धव ठाकरे सभा घेत आहेत, त्याच्य ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभा होत आहेत. असा उल्लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढी पाडवा मेळाव्यात केला. राज ठाकरे बोलल्याप्रमाणेच काहीसे चित्र आता दिसत आहे. कारण जिथे जिथे उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. त्याच ठिकाणी शिंदेंचेही यात्रा निघणार असल्याचे बोलले जाते.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी शिंदे-फडणवीस विरोधात आघाडी उघडणार आहे. त्याच ठिकाणाहून संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण यात्रेला सुरूवात होणार आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरणधील ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे,यांच्या मोठ्या सभा पार पडल्या. त्याच मैदानावर शिंदेंची ‘धनुष्यबाण यात्रे’च्या सुरूवातीची सभा होणार आहे.