मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खेडमध्ये होणार सभा

खेड : रत्नागिरीच्या खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला. दरम्यान, आता  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील खेडमध्ये जाहीर सभा होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना काय उत्तर देणार, हे पाहावे लागणार आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मला निवडणूक आयोगाला खास सांगायचं आहे की, तुमच्या डोळ्यांत मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला या. कोणती शिवसेना आहे ते बघायला या. हा चुना लगाव आयोग आहे. सत्तेचे गुलाम आहेत. वरुन जो हुकूम येतो त्याप्रमाणे वागणारे हे गुलाम आहेत. हे निवडणूक आयोग म्हणायच्या लायकीचे नाहीत हे मी उघडपणे बोलतोय, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ज्या तत्वावर शिवसेना त्यांची असं म्हटलं आहे ते तत्वच झूठ आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही तर माझ्या वडिलांनी केलेली आहे. निवडणूक आयुक्तांचे वडील कदाचित त्या ठिकाणी बसले असतील पण ते तुमचे वडील असतील माझे वडील नाहीत”, अशा शब्दांतही उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.

तसेच जे शिवसेना तोडण्याचा फोडण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न करत आहात त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही नेमकं काय करताय ते तुम्हाला लक्षात येत नाहीय. तुम्ही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न नाही तर तुम्ही मराठी माणसाच्या एकजुटीवर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही हिंदूंच्या एकजुटीवर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.