मुंबई : सध्या विरोधकांची अवस्था ‘हम आपके है कौन’ सारखी झालेली आहे. त्यांनी सक्षम विरोधी पक्षासारखे काम करावे, आमच्याकडे प्रचंड बहुमत असले, तरी अधिवेशनात विरोधी पक्षांचा सन्मान ठेवूनच काम करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
लोककल्याणकारी योजनांचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर थोडा ताण असला तरी, राज्याची आर्थिक शिस्त आम्ही योग्य ठेवली आहे. त्यामुळे लाडकी बहीण असो वा इतर कोणत्याही लोककल्याणकारी योजना राज्य सरकार बंद करणार नाही, असा निर्वाळा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
धनंजय मुंडे यांच्याबाबत सरकारने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याबाबत न्यायालयात जो निर्णय येईल, त्यानुसार सरकार भूमिका घेईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत जो कोणी अवमानकारक वक्तव्य करेल, त्याला पाठीशी न घालता कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आज, सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू झालं आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विरोधी पक्षांनी त्यावर नेहमीप्रमाणे बहिष्कार घातला. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्री उपस्थित होते.
आमच्यात शीतयुद्ध नाही
एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या कोणत्याही योजनांना मी स्थगिती दिली नाही किंवा चौकशीही सुरू केली नाही. आमच्यात कोणतेही शीतयुद्ध नाही, उलट वॉरच कोल्ड आहे. आमदार जेव्हा एखाद्या कामाबाबत तक्रार करतो, तेव्हा त्याची माहिती घ्यावी, असा शेरा पत्रावर मारण्यात येतो. म्हणजे त्याची चौकशी करण्याचा आदेश दिला, असा अर्थ होत नाही. जेव्हा कधी एकनाथ शिंदे अथवा अजित पवार यांच्याशी संबंधित खात्यांचा विषय येतो, तेव्हा त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येतो, असेही फडणवीस म्हणाले.