मुंबई : सावरकर यांचा अपमान करणं हा देखील देशद्रोहच आहे. त्यामुळे सावरकरांचा अपमान करू नका. आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत विरोधकांना धारेवर धरलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केल्यावरूनही त्यांनी विरोधकांना फटकारलं.
काय म्हणाले शिंदे?
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह बोलणं हा देखील देशाचा अपमान आहे. गेली आठ महिने मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून गद्दार म्हणणं. खोके म्हणणं, चोर म्हणणं हे कोणत्या आचारसंहितेत बसतं? आम्ही कालच्या जोडो मारो आंदोलनाचं समर्थन केलं नाही. पण सावरकरांचा वारंवार अपमान करणं हे देखील देशद्रोहाचं काम आहे. यात एकच सांगतो, जेव्हा दुसऱ्याकडे आपण एक बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे तीन बोटे असतात. सभागृहाचं पावित्र्य जपलं पाहिजे. या सभागृहात मोठमोठी माणसं होती. या सभागृहात आणि बाहेर कोणतंही चुकीचं वर्तन होता कामा नये. आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही बोलू शकत नाही असा घेऊ नका, असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला.