Murder Case : सतत अपयश; आई-वडिलांनी सांगितलं शेती कर, मुलाने थेट त्यांनाच संपवलं

Murder Case : सातत्याने नापास होत असलेल्या आणि आई-वडिलांच्या टोमण्यांना कंटाळलेल्या मुलाने आपल्या पालकांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे.

कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन म्हणून काम करणारे लीलाधर डाखोळे (५१) आणि त्यांची पत्नी अरुणा डाखोळे (४८), या संगीत शिक्षिकेचा खून त्यांचा २४ वर्षीय मुलगा उत्कर्ष डाखोळे यानेच केल्याचे समोर आले आहे. उत्कर्ष इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला होता, तर त्याची बहिण सेजल बीएएमएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे.

टोमण्यांमुळे रागाचा स्फोट

उत्कर्ष गेली सहा वर्षे इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात नापास होत होता. सततच्या अपयशामुळे पालक त्याला शेती करण्याचा सल्ला देत होते. २५ डिसेंबर रोजी वडिलांनी त्याला मारहाण केली, तर आईने त्याची बॅग भरून ठेवत शेतीसाठी तयारी करायला सांगितले. या गोष्टीमुळे उत्कर्ष अत्यंत संतापला. रोजच्या टोमण्यांनी त्रस्त झालेल्या उत्कर्षने रागाच्या भरात आपल्या पालकांना संपवण्याचा निर्णय घेतला.

हत्येचा थरार

आई अरुणा हॉलमध्ये विद्यार्थ्यांचे पेपर तपासत असताना उत्कर्षने मागून गळा दाबून तिचा जीव घेतला. नंतर वडील लीलाधर घरात आले असता, त्यांना हे दृश्य पाहून धक्का बसला. सोफ्यावर बसलेल्या वडिलांच्या मानेवर उत्कर्षने चाकूने वार करून त्यांनाही ठार केले. खून केल्यानंतर उत्कर्षने घराचे दार बंद करून, कॉलेजला गेलेल्या आपल्या बहिणीला फोन करून आई-वडील मेडिटेशनसाठी बंगलोरला गेल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर काकांकडे राहण्यासाठी तिला सांगितले.

हत्याकांडाचा पर्दाफाश

काही दिवसांनंतर, एक नातेवाईक घरी आले असता दुर्गंधीमुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आले. सध्या उत्कर्षला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या धक्कादायक घटनेमुळे नागपूर शहर हादरले असून, कुटुंबामधील ताण-तणाव किती भयंकर परिणाम घडवू शकतो, याचा हा थरारक अनुभव ठरला आहे.