बाल विवाह रोखण्यासाठी ‘ऑपरेशन अक्षताला’ प्रतिसाद

तरुण भारत लाईव्ह न्युज | जळगाव : प्रत्येकाची जबाबदारी असून गुन्ह्याच्या दृष्टीने विचार केला असता पोलीस अधिकारी म्हणून बाल विवाह रोखणे ही एक महत्वाची जबाबदारी आहे. वरील सर्व बाबींचा सांगोपांग विचार करुन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन अक्षता हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ऑपरेशन अक्षता सुरु झाल्यानंतर फक्त महिन्याभराच्या काळात स्वंयस्फूर्तीने बालविवाह विरोधी ठराव घेवून ऑपरेक्षन अक्षता या उपक्रमास पाठिंबा दिला आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम सुरु झाल्याने ग्रामीण भागात प्रत्यक्ष काम करणार्‍या ग्रामसेवक, पोलीस पाटील, बीट अंमलदार, प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारीका तसेच आशा स्वयंसेविका यांना प्रेरणा मिळून त्यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी पोलीस दलास सहकार्य केले आहे.

पी. आर. पाटील म्हणाले की, आदिवासी बहूल नंदुरबार जिल्ह्यात बालविवाह होणे, परंतु त्याबाबत कोणतीही तक्रार न होणे, ते विवाह झाल्याचे समोर न येणे यासारख्या गोष्टीनव्हे, तर सर्व देशभरात बाल विवाह ही गंभीर समस्या आहे. बालविवाह रोखण्याबरोबरच महिला व मुली यांच्या हरविण्याच्या, अपहरण होण्याच्या, लैंगिक गुन्ह्यांच्या तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबाबत देखील उपक्रमाच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना करणे शक्य होणार आहे. तसेच जिल्ह्यात घडणारा प्रत्येक बाल विवाह रोखला जाऊन शेवटच्या घटकापर्यंत बाल विवाह विरोधी जागरुकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश्य आहे. तसेच उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांव पातळीवर आशा स्वयंसेवीका, पोलीस पाटील, सरपंच, प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारीका व पोलीस बिट अंमलदार यांची भूमिका असणार आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना बालविवाहाबाबत तक्रार करणे सोयीचे व्हावे यासाठी चाईल्ड लाईन या समाजसेवी संस्थेच्या 1098 या हेल्पलाईन क्रमांकाबरोबरच जिल्हा पोलीस दलाकडून 9022455414 हा हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे.