यावल : यावलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. शिवाजी शामराव गाढे (वय-३५, रा. शिवाजीनगर, यावल) असे मृत तरुणाचे नाव असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडालीय. दरम्यान, शिवाजी गाढे यांनी आत्महत्या का केली या मागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे घटना
यावल शहरातील शिवाजीनगर परिसरात शिवाजी गाढे हा पत्नी व मुलांसह वास्तव्याला होता. फेटे बांधण्याच्या कामामुळे संपूर्ण शहरात सर्वांना परिचित होता. त्याची पत्नी आज शेतात कामाला गेलेली होती. यावेळी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिवाजी गाढे हा घरी एकटाच होता. तर त्याची दोन लहान मुले घराबाहेर खेळत होती. यादरम्यान राहत्या घरात शिवाजी याने गळफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी धाव घेवून त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख यांनी त्याला मृत घोषित केले.
याबाबत मृताचा भाऊ अशोक शामराव गाढे यांनी दिलेल्या माहितीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर व पोलीस करीत आहेत.
शिवाजी गाढे याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. शिवाजी गाढे याच्या आत्महत्ये मागचे कारण समजू शकले नाही. शिवाजी गाढे याने साधारण दीड वर्षांपूर्वीही विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी वेळीच उपचार घेतल्याने बचावला होता. मात्र यावेळी पुन्हा शिवाजी याने आत्महत्येचा प्रयत्न केला. दुर्देवाने तो सफल ठरला. सर्व काही सुरळीत असताना शिवाजी याने अचानक एवढ्या टोकाचा निर्णय का घेतला? हाच प्रश्न त्याच्या कुंटुबीयांसह सर्व मित्र परिवाराला पडला. दरम्यान, शिवाजी याच्या मृत्यूने त्याच्या दोन्ही चिमुकल्यांचे कोवळ्या वयातच पितृछत्र हरपल्यामुळे घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.