China : सत्य हे कल्पनेच्याही पलीकडचे असते, या उक्तीचा प्रत्यय चीनमधील एका घटनेमुळे आला आहे. आतापर्यंत तुम्ही केवळ चित्रपटांमध्येच पुनर्जन्म होण्याची किंवा मेलेली व्यक्ती जिवंत होण्याची घटना पाहिली असेल. मात्र चीनमध्ये मृत समजून शवपेटीमध्येही ठेवलेली महिला चक्क सहा दिवसांनी पुन्हा जिवंत झाल्याचं समोर आलं आहे.
ही घटना चीनच्या गुआंगशी प्रांतातील आहे. याठिकाणी राहणाऱ्या एका 95 वर्षीय महिलेचा झोपेतच मृत्यू झाला होता. तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती जागी झाली नाही. तिचा श्वासोच्छवासही थांबला होता. यामुळे तिला मृत समजून शेजाऱ्याने तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.
या महिलेला तिच्या 60 वर्षीय शेजाऱ्याने एका शवपेटीमध्ये ठेवलं. मात्र, या महिलेची मुलं आणि नातेवाईक दुसऱ्या शहरांमध्ये राहतात. त्यांना येऊन अंत्यदर्शन घेता यावं यासाठी ही शवपेटी शेजाऱ्याने घरातच ठेवली होती. ही शवपेटी उघडीच ठेवण्यात आली होती.
सहा दिवसांनी जेव्हा तिला दफन करण्याच्या उद्देशाने शेजारी तिच्या घरी परत आला, तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ही महिला शवपेटीमध्ये नव्हती, तर आपल्या किचनमध्ये स्टूलवर बसली होती. हे पाहून त्या व्यक्तीची बोबडीच वळाली. ही महिला मात्र जणू काही झालंच नाही अशा थाटात जेवण बनवत होती.
झोपून उठल्यावर आपल्याला खूप भूक लागली होती, त्यामुळे आपण थेट किचनमध्ये जाऊन खाण्यासाठी काहीतरी बनवत होतो; असं या महिलेने सांगितलं.
कृत्रिम मृत्यू
या प्रकाराला डॉक्टर कृत्रिम मृत्यू म्हणतात. यामध्ये साधारणपणे एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छवास तर बंद होतो. मात्र, शरीर थंड पडत नाही. या महिलेला डोक्याला दुखापत झाल्यामुळे ती बेशुद्ध पडली होती. त्यानंतर तिला मृत समजण्यात आलं. आता तिची प्रकृती सुधारत असल्याचं स्थानिक माध्यमांनी स्पष्ट केलं आहे.