नवी दिल्ली : अमेरिकेप्रमाणे भारतातही चीनची स्पाय बलूनद्वारे हेरगिरी सुरू असल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त प्रकाशित करण्यात आलं आहे. भारतातील लष्करी तळ आणि संवेदनशील ठिकाणांवर हेरगिरी केल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. चीननं केवळ अमेरिकाच नव्हे तर भारतातील महत्त्वाची लष्करी ठिकाणं आणि संवेदनशील स्थळांची माहिती घेण्यासाठी चीनेनं या बलूनचा वापर केला असल्याचं सांगितलं जात आहे.
वॉशिंग्टन पोस्टनं आपल्या एका रिपोर्टमध्ये लिहिलंय की, स्पाय बलूनद्वारे इतर देशांवर लक्ष ठेवण्याचं काम चीनच्या दक्षिण किनारपट्टीपासून दूर असलेल्या हैनान प्रांतातून चालवलं जातं. याद्वारे चीननं जपान, भारत, व्हिएतनाम, तैवान आणि फिलिपाइन्ससह इतर धोरणात्मक हितसंबंध असलेल्या अनेक देशांची आणि प्रदेशांची हेरगिरी केली आहे. चीन याद्वारे सर्व देशांची लष्करी माहिती गोळा करतोय. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता, अमेरिकन अधिकार्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर अहवालात म्हटलंय की, हे स्पाय बलून चिनी सैन्य चालवतात आणि हे बलून आतापर्यंत पाच खंडांमध्ये पाहिले गेले आहेत.
हेरगिरीसाठी स्पाय बलूनमध्ये अत्याधुनिक कॅमेरे बसवलेले असतात. एखाद्या क्षेत्राचा दीर्घकाळ अभ्यास करण्याची क्षमता या स्पाय बलून्समध्ये असते. जमिनीवरून ज्या क्षेत्राचे निरीक्षण करणे खूप कठीण आहे, त्या क्षेत्राचा अधिक अभ्यास करण्यासाठी याचा वापर केला जातो. स्पाय बलून जमिनीपासून जास्त उंचीवर उडू शकतात, म्हणून त्यांचा वापर हवामानाशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. तसेच, हेरगिरीसाठी हे बलून उपग्रहांपेक्षा सरस ठरतात. कारण ते उपग्रहांपेक्षा एखादं क्षेत्र अधिक सहजपणे आणि जास्त काळ स्कॅन करू शकतात.