जळगाव : पोलिसांच्या मारहाणीत कच्चा कैदी चिन्या जगताप याचा जळगाव कारागृहात मृत्यू झाला होता. याप्रकरणी राज्य शासनाच्या गृह विभागाने तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्र्स गायकवाड यांना निलंबित केले आहे.
अडीच वर्षांपूर्वी जळगाव कारागृहात पोलिसांच्या मारहाणीत कच्चा कैदी चिन्या जगताप याचा मृत्यू झाला होता. यात तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्र्स गायकवाड यांच्यासह तुरुंगधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत राज्य शासनाच्या गृह विभागाचे उप सचिव विनायक चव्हाण यांनी 3 दिवसांपूर्वी आदेश काढले आहेत. 11 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूस हे पाच जण जबाबदार असल्याचे आरोप मयत चिन्या जगताप यांची पत्नी मीना जगताप यांनी केले होते.
पोलीस दाद देत नाहीत हे लक्षात आल्यावर मीना जगताप यांनी उच्च न्यायालयात याचिका (क्रमांक – 1706 / 2020) दाखल केली होती. या याचिकेची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे . चिन्यांचा शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा अहवालात त्याच्या शरीरावर मारहाणीच्या 22 जखमा असल्याचे नमूद आहे.
यासंदर्भात तत्कालीन तुरुंग रक्षक मनोज जाधव यांनी 26 नोव्हेंबर 2021 रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला होता.