Chopada : दगडाने अर्थात जात्याने कवितेला जितेपण दिले. जात्यावरील ओव्यांमधून कविता घरात आली. कवितेने हसवलं रडवलं तसेच जगायलाही शिकवले. कवी समाजातली जी दाहकता बघतो, अनुभवतो ती कवितेतून व्यक्त करतो. कविता मनाचा कान करुन ऐकावी लागते, असे सांगत प्रसिद्ध कवी नारायण पुरी (छत्रपती संभाजी नगर) यांनी आपल्या कवितांमधून समाजातल्या अव्यवस्थेवर, राजकारणातल्या ओंगळपणावर कडक शब्दात कोरडे ओढले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे च्या चोपडा शाखेतर्फे चौथ्या प्रियजन स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘कविता जना-मनाची’ या विषयावर गुंफतांना ते बोलत होते. पंकज नगर येथील पंकज बाल संस्कार केंद्राच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात यावेळी मंचावर शाखेचे अध्यक्ष कवी अशोक सोनवणे, प्रायोजक डॉ. विकास हरताळकर, घनश्याम अग्रवाल, डॉ. राहुल पाटील, भूपेंद्र पाटील यांच्यासह डॉ. सुरेश बोरोले, शाखेचे कार्याध्यक्ष विलास पाटील, रमेश शिंदे, आर्. एच. बाविस्कर हे उपस्थित होते. याप्रसंगी मसाप सदस्या संगीता बोरसे यांच्या ‘काव्य फुले’ आणि ‘भावबंध’ या दोन काव्य संग्रहांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले, पूर्वी भाऊ, भाई, दादा हे मायेचे, आधाराचे, सहाऱ्याचे शब्द होते. सध्या या शब्दांचे संदर्भ बदललेले आहेत. आपण शब्दांचा तो पूर्वीचा भाव जपला पाहिजे. टाळी जशी हाताने वाजते तशी अंतःकरणाने सुद्धा वाजते. १९९० नंतर ‘मुलं’ जन्मायचे थांबले आणि ‘बापच’ जन्माला यायला लागले. कारण आताची पिढी हुशार असून ती आपल्या आई-वडिलांना शिकवत असते.
देशात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर पहिल्यांदाच तिरंग्याची विक्री झाली अर्थात आपल्या अस्मितेची विक्री झाली. आपल्या देशात सारे नेते ‘हा देश गांधीचा’ असे म्हणतात परंतु ते जेव्हा ‘हा देश आपला’ म्हणतील तेव्हा या देशातील समस्या सुटतील, असे सांगत त्यांनी राजकारण्यांवर बोचरी टीका केली. ‘काटा’ आणि ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ या आपल्या प्रसिध्द कविता अतिशय प्रभावीपणे गाऊन सादर करताना त्यांनी दैनंदिन जगण्यातले आणि राजकारणातले संदर्भ दिलेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन लाठी यांनी तर प्रास्ताविक विलास पाटील यांनी, वक्त्यांचा परिचय योगिता पाटील यांनी व आभार प्रदर्शन कार्यवाह गौरव महाले यांनी केले. अशोक सोनवणे, संगीता बोरसे यांनी मनोगते व्यक्त केलीत तर शरद धनगर (अमळनेर) या युवा कवीने एक अहिराणी कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. व्याख्यानास रसिक श्रोते, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारायण पुरी यांनी श्रोत्यांना मनमुराद हसवत प्रसंगी अंतर्मुख केले. त्यांच्या कविता आणि विनोदांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.