जळगाव : चोपडा शहरात शनिवारी रात्री घडलेल्या थरारक हत्याकांडचे कारण अखेर समोर आले आहे. आपल्या उच्चशिक्षित मुलीने कमी शिकलेल्या मुलाशी प्रेमविवाह केला. याच रागातून आरोपी निवृत्त सीआरपीएफ अधिकारी किरण मांगले याने जन्मदात्या मुलीलाच गोळीझाडून संपविले. या हृदयद्रावक घटनेत फक्त तृप्तीलाच नव्हे तर तिच्या होणाऱ्या बाळालादेखील जीव गमवावा लागला आहे. कारण तृप्ती ही चार महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती तिची सासू प्रियांका वाघ यांनी दिलीय.
मृत तृप्ती अविनाश वाघ (२४) आणि अविनाश ईश्वर वाघ (२८, दोघे रा. करवंद, शिरपूर, ह. मु. कोथरूड, पुणे) यांनी दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, हा विवाह आरोपीला मान्य नव्हता. दरम्यान, आरोपीला शनिवारी सायंकाळी तृप्ती आणि अविनाश दोघेही चोपडा येथे आल्याची माहिती मिळाली. त्याने तात्काळ चोपडा शहरातील आंबेडकर नगर परिसरात सुरु असलेला हळदीचा समारंभ गाठला.
अविनाश आणि तृप्ती दोघेही जल्लोष साजरा करताना आरोपीने थेट आपल्या मुलीवर गोळीबार केला. जावई अविनाश यावरदेखील गोळीबार करून हल्ला चढवला. यात तृप्तीला अगदी जवळून गोळी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर जावई अविनाश हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अन् तृप्तीने अविनाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला
धुळेच्या शिरपूरातील करवंद गावात रहिवासी असलेली तृप्ती ही वैद्यकीय शिक्षणानिमित्त पुण्यात होती. यावेळी आपल्याच नातेवाईकांमधील अविनाश याच्याशी तिचे प्रेम संबंध जुळले. या प्रेमसंबंधातून तिने अविनाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
तृप्तीला वाटलं वडील मान्य करतील, पण…
कुटुंबाचा वाद असला तरी अविनाश हा नात्यातीलच असल्याने वडील विवाहाला मान्यतादेतील, असा तृप्तीचा विश्वास होता. याबाबत तिने वडिलांही सांगितले होते. मात्र अविनाश याच्या कुटुंबाशी असलेलं वैर, तसेच तृप्तीच्या तुलनेत कमी असलेलं अविनाशचं शिक्षण. यामुळे तृप्तीचे वडील किरण मांगले याचे त्यांच्या विवाहला कडाडून विरोध होता.
तृप्ती चार महिन्यांची होती गर्भवती
हृदयद्रावक म्हणजे, मृत तृप्ती ही चार महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती तिची सासू प्रियांका वाघ यांनी दिली. एवढेच नव्हे तर, मागे एकदा किरण मांगले यांनी आपल्या मुलीचा जबरदस्ती गर्भपात केल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे. दरम्यान, तृप्ती चार महिन्यांची गर्भवती असल्यामुळे या हल्ल्यात एक नव्हे तर दोन जीव गेले आहेत.
पोलिसांकडून सखोल चौकशी
या घटनेनंतर चोपडा शहर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरुद्ध मुलीची हत्या, जावयाची हत्या करण्याचा प्रयत्न, तसेच गोळीबार केल्याचा गुन्हा हा दाखल करण्यात आला असून, या घटनेची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.