चोपडा दरोड्यातील कुविख्यात आरोपी शिरपूर शहर पोलिसांच्या जाळ्यात

तरुण भारत लाईव्ह न्युज शिरपूर : चोपडा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील धुळ्यातील कुविख्यात आरोपीच्या शिरपूर फाट्यावरून शिरपूर शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शुक्रवार, 7 रोजी दुपारी दिड वाजता ही कारवाई करण्यात आली. अब्दुल इस्लाम मोहम्मद रफिक चौधरी (भंगार बाजार, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्यास चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्ह्यात यापूर्वी सहा आरोपींना अटक करण्यात आली होती तर मास्टर माईंड अब्दुल इस्लाम हा पसार होता.

अटकेतील आरोपींची संख्या झाली सात

चोपडा शहर हद्दीत बुधवार, 22 मार्च रोजी रात्री एक वाजता शिरपूर बायपास रोडवरील हॉटेल सुनीताजवळ स्कूटी व चारचाकीतून आलेल्या आरोपींनी ट्रक चालक सुरेश प्रतापसिंग चव्हाण (बेडीपुरा टेकडीजवळ, मिर्झापूर, ता.कसरावत, मध्यप्रदेश) यांना मारहाण करीत त्यांच्याकडील दिड हजारांची रोकड व तीन हजारांचा मोबाईल व ट्रकची चावी हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी गेंदालाल मिल भागातून गुन्हे शाखेने नवाब खान गुलाब खान (32, शिवाजीनगर, जळगाव), शाहरुख खान शाबीर खान (20, गेंदालाल मिल जळगाव), सौरभ भुवनेश्वर लांजेवार (35, रायपूर, छत्तीसगड), जावेद खान नसीर खान (32, गेंदालाल मिल, जळगाव), प्रदीप राधेश्याम रायपुरीया (34, गेंदालाल मिल, जळगाव) यांना अटक केली होती तर मुख्य मास्टरमाईंड पसार होता. त्याच्या शुक्रवारी शिरपूर शहर पोलिसांनी मुसक्या आवळत चोपडा शहरचे उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांच्या ताब्यात दिले.

यांनी केली कारवाई

ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर निरीक्षक ए.एस.आगरकर, उपनिरीक्षक किरण बार्‍हे, हवालदार ललित पाटील, लादुराम चौधरी, नाईक मनोज पाटील, कॉन्स्टेबल प्रवीण गोसावी, सचिन वाघ आदींच्या पथकाने केली.