शहादा : एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेसा असा प्रकार शहादा न्यायालयाच्या आवारात घडला. चारचाकी वाहन चोरी प्रकरणात अटकेतील संशयीताला न्यायालयात हजर करण्यात आणल्यानंतर संशयिताने विना क्रमांकाची चारचाकी येताच पोलिसांच्या हाताला झटका मारून बेडीसह पलायन केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. दरम्यान, चारचाकी चालकाने आरोपीसह पळ काढताना एकाला धडक दिल्याने एक जणदेखील गंभीर जखमी झाला आहे. ओमप्रकाश उर्फ ओमाराम किसनराव जाट लेहा (25, बायतु, जि.राजस्थान) असे पसार आरोपीचे नाव आहे.
सिनेस्टाईल आरोपीचा पळ
शहादा पोलिसात गुरनं.807/22, भादंवि 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यात आरोपी ओमप्रकाश उर्फ ओमाराम किसनराव जाट हा वॉण्टेड असल्याने त्यास राजस्थानच्या बायतू येथून अटक करण्यात आली होती. सोमवारी संशयिताची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यास शहादा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सुनावणी झाल्यानंतर संशयित बाहेर येत असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संशयिताने नातेवाईकांशी चर्चा केली व त्यानंतर न्यायालयाच्या आवारात विना क्रमांकाची पांढर्या रंगाची स्कॉर्पिओ चारचाकी येताच संशयिताने पोलिसांना झटका देताच बेडीसह पळ काढला.
चारचाकीच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी
काही कळण्याआत सुसाट वेगाने चारचाकी न्यायालयाबाहेर पडली. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला मात्र उपयोग झाला नाही शिवाय न्यायालयाबाहेर आरोपींच्या वाहनाने दुचाकीस्वार सुरेश कानजी चौधरी (शहादा) यास धडक देत फरफटत नेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत नाकाबंदी केली मात्र संशयित गवसला नाही. प्लॅनिंग करूनच आरोपीने पळ काढल्याची चर्चा आहे.