---Advertisement---
नंदुरबार : जिल्ह्यातील नागरिकांना विविध कामांसाठी लागणारा उत्पन्न दाखला देण्याबाबत तलाठींकडून असमर्थता दर्शविण्यात आली होती. नागरिकांच्या स्वयंम घोषणापत्राच्या आधारावरून उत्पन्न दाखला वितरित करण्यात यावा, असे सांगून ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) उत्पन्न दाखला देण्याचे थांबवित असल्याचे निवेदन राज्य तलाठी संघाच्या नंदुरबार शाखेच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले होते. परंतु हा दाखला तलाठींनीच द्यावा, असे आदेश नंदुरबार तहसीलदार कार्यालयाकडून काढण्यात आले आहेत.
नंदुरबार तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी दिलेल्या आदेशानुसार तलाठींकडून करण्यात आलेली मागणी शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांशी सुसंगत नाही. नागरिकांना देण्यात येणारे विविध प्रकारचे दाखले व पपत्रे यांचे प्रमाणिकरण व कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शक सूचना व निकष ठरविण्याचे कार्य शासनाचे आहे. शासन निर्णयानुसार उत्पन्न अहवाल देण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
यानुसार तलाठींकडून उत्पन्न दाखल्याचे वितरण करण्याचे काम सुरू करण्यात यावे असे म्हटले आहे. हे आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील तलाठी संवर्गाकडून उत्पन्न दाखले वितरित करण्याचे कामकाज सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्वयंम घोषणापत्रही चालणार
नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागात शिधापत्रिकेचे केवायसीचे काम सुरू आहे. त्यासाठी लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानदाराकडे उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. स्वस्त धान्य दुकानदाराकडे अर्जदारांनी स्वयंमघोषणापत्र आणि ख फॉरमॅटमध्ये तलाठी यांच्या अहवालावर सही घेत दुकानदाराकडे दिल्यास ई-केवायसी होणार असल्याची माहिती आहे.