---Advertisement---
भुसावळ : नाशिक विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग पालिकेने साडेपाच कोटी रुपये खर्चून जीर्ण पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती केल्याचा दावा केला, परंतु शहरवासीयांना अजूनही गाळमिश्रित आणि दूषित पाणी मिळत आहे. या समस्येमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे.
पालिकेच्या दाव्यानुसार, पाणीपुरवठा यंत्रणेला पुनरुज्जीवन करून रोटेशन आठ दिवसांवर आणणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात रोटेशनमध्ये काहीही फरक नाही; आजही शहरात पाणी दर 10 दिवसांनीच मिळत आहे. तापी नदी पूर्ण वाहत असतानाही उन्हाळ्यासारखी पाणीपुरवठ्याची परिस्थिती कायम आहे.
शहरातील जलवाहिन्यांमध्ये दरमहा किमान 200 ठिकाणी गळती होत असल्याचे पालिकेच्या नोंदी दाखवतात. या गळतीमुळे अशुद्ध पाणी घराघरात पोहोचत असून जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. नागरिकांकडून प्रश्न विचारला जात आहे की, 5.5 कोटी रुपये नेमके कुठे खर्च झाले आणि कंत्राटदाराने काय काम केले?
पालिकेने या दुरुस्तीचा मोठा दावा केला, तरी प्रत्यक्ष परिणाम नगरकेंद्रीत पाणीपुरवठ्यावर नाही दिसत. आगामी पालिका निवडणुकीत जनतेच्या पैशांचा अपव्यय हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.









