कर्नाल : भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी काँग्रेसने सर्व विरोधी पक्षीची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी थांबायचं नाव घेत नाही. हरियाणातील कर्नाल येथील सभेदरम्यान प्रदेश काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजी पाहायला मिळाली. येथे दोन गटांचे समर्थक एकमेकांशी भिडले आणि दोघांनी एकमेकांना लाथा-बुक्कांनी माराहाण केली.
भूपेंद्र सिंग हुड्डा आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या समर्थकांनी एकमेकांशी हाणामारी केली आणि लाथा-बुक्क्या मारल्या. योगराज जिल्हा प्रभारी लहरी सिंह यांच्यासोबत बैठकीसाठी आले होते. मात्र यावेळी त्यांच्या विरोधात गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. कारवर लावलेल्या लाऊड स्पीकरमधून मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात होती. दरम्यान, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश सलुजा तेथे आले.
सलुजा यांनी गाडीतून लाऊडस्पीकर काढून टाकला. यावरून दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली. हाणामारीत सलुजाचा चष्मा तुटला, मात्र त्यांनी लाऊडस्पीकर जमिनीवर फेकून फोडला. यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाली. सुमारे 15 मिनिटं हा गोंधळ सुरू होता. ही सर्व घटना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे समन्वयक योगराज भदौरिया, हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे समन्वयक जर्नेल सिंग आणि एसएल शर्मा यांच्यासमोर घडली.