अजित पवार – संजय राऊतांमध्ये संघर्ष; राऊत म्हणाले, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नाराजीनाट्याला खुद्द त्यांनीच पुर्णविराम दिला. आमची वकिली कुणीही करायची गरज नाही. जे काही आमच्या पक्षाबाबत सांगायचं आहे ते आम्ही सांगू इतरांनी त्यात पडू नये असं अजित पवार यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता सुनावलं होतं. यानंतर आता संजय राऊत यांनी आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत असं उत्तर देत अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यामुळे महाविकास आघाडीत नव्या संघर्षाला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चालले, हे इतरांनी कुणी सांगू नये. तुम्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहात का, आम्ही कुणालाही वकीलपत्र दिलेले नाही. ज्याने त्याने आपल्या मुखपत्रातून आपल्या पक्षाविषयी लिहावे, असे रोखठोक भाष्य अजित पवार यांनी केले. याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर देताना, सामनाच्या अग्रलेखातून काहीही चुकीचे लिहिलेले नाही. विरोधकांना फोडण्याचे प्रयत्न सुरु नाहीत का? सत्य लिहिले आहे आणि सत्य बोलण्याची हिंमत ठेवतो. अजितदादांनी सांगावे, असे घडत नाही का, असा रोकडा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

महाविकास आघाडीत आम्ही अजित पवारांवर प्रेम करतो. पण हा पक्ष फुटत असताना आम्ही चिंता व्यक्त करण्यात काहीही चुकीचे नाही. महाविकास आघाडीचा मी चौकीदार आहे. त्यामुळे बोललो. अजितदादा माझ्यावरच खापर का फोडतायत? शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होता. आपल्या बरोबरचा घटकपक्ष मजबूत रहावा, त्याचे लचके तुटले जाऊ नये, ही आमची भूमिका असेल, तरीही कुणी आमच्यावर खापर फोडत असेल तर गंमत आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.