यावल : शहरात आंतरजातीय विवाहाच्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. यात तरूण जखमी झाला असून, भर रस्त्यातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.
यावल शहरातील एका तरूणाने २४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुसर्या एका समाजातील तरूणीशी विवाह केला होता. यामुळे तरूणाला मुलीच्या माहेरच्या मंडळीकडून नेहमीच धमकावण्यात येत होते. यातच आज बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास तरूणाला बस स्थानकाच्या समोर मुलीच्या आप्तांनी बेदम मारहाण केली. यात बंदूक ताणून त्याला धमकावतांना फायटरने मारून चाकूने वार करण्यात आले. यात तरूण जखमी झाला.
दरम्यान, भर रस्त्यातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेताच हल्लेखोरांनी पळ काढला. या प्रकरणी सदर तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून मुलीच्या माहेरच्या १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात मुलीच्या माहेरच्या मंडळीच्या वतीने मुलीच्या वडलांच्या मित्राने दुसरी फिर्याद दाखल केली आहे. यात याच प्रकरणात विवाह केलेला तरूण हा मुलीच्या माहेरच्या लोकांना सातत्याने धमकावत होता असे नमूद केले आहे. या प्रकरणी सदर तरूण आणि त्याच्या सोबतच्या एकूण ११ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अशा प्रकारे या हाणामारीत परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून एकूण २९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त राखण्यात आला आहे.