तरुण भारत लाईव्ह । जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राखीव प्रवर्गातून लढविणाऱ्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने एक वर्षाची मुदत दिली आहे.
या निर्णयामुळे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ३ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी उमेदवारांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होत आहेत.
बाजार समितीच्या बाजार क्षेत्रात राहणारे १५ शेतकरी कृषी पतसंस्था सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांकडून निवडले जाणार आहेत. १५ पैकी ११ शेतकरी सहकारी संस्थेचा मतदार संघ व चार शेतकरी ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडले जाणार आहेत.
सहकारी संस्थेच्या मतदार संघात महिला प्रवर्गासाठी दोन, इतर मागास प्रवर्ग एक आणि विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीसाठी एक जागा राखीव आहे. ग्रामपंचायत मतदार संघात अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी एक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी एक जागा राखीव आहे.
दरम्यान, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केले होते. यासंदर्भात निवडणूक प्रशासनाने प्राधिकरणाला जातवैधतेसाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ही विनंती मान्य केली असून, राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता एक वर्षाची मुदत दिली आहे.
राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास निवडणुकीनंतर एका वर्षात जातवैधता प्रमाणपत्र सादर करेल, असे हमीपत्र अर्जासोबतच द्यावयाचे आहे. निवडून आल्यानंतर बारा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र न सादर केल्यास त्याची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल. तसे आदेश निवडणूक प्राधिकरणाने काढले आहेत.
संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक, जळगाव