---Advertisement---
पाचोरा, प्रतिनिधी : तालुक्यातील सातगाव ( डोंगरी) परिसरात पहाटेच्या सुमारास घाटनांद्रा भागातील जोगेश्वरी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे बामणी व दगडी नदीला अचानक पूर आला. या पूरस्थितीमुळे सातगाव (डोंगरी) येथील धरणात डोंगर माथ्यावरून आलेल्या पाण्याचा मोठा विसर्ग होऊन धरण क्षमतेच्या 100 टक्के भरले. अतिरिक्त पाण्यामुळे धरणालगतच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पूराच्या पाण्यामुळे गावातील शेकडो कुटुंबांच्या घरगुती वस्तू, धान्य, कपडे, पलंग, भांडी व शेतीची साधनसामग्री भिजून खराब झाली. अनेक कुटुंबे उघड्यावर पडली असून तातडीने निवारा केंद्राची आवश्यकता निर्माण झाली आहे. पूरग्रस्त महिलांच्या हातातील स्वयंपाकासाठीचे धान्य व किराणा साहित्य पाण्यात वाहून गेल्याने संसार उघड्यावर आला आहे .
मदतकार्य सुरु
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आमदार किशोर पाटील, भाजपचे नेते मधुकर काटे, जिल्हा परिषद सदस्य तसेच तहसीलदार विजय बनसोडे, संबंधित तलाठी व महसूल विभागाचे अधिकारी तातडीने दाखल झाले. त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून पीडितांना तातडीने मदत मिळावी यासाठी संबंधित विभागाला आदेश दिले.
पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला असून प्रशासनाकडून प्राथमिक मदत म्हणून अन्नधान्य व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. परंतु नुकसानीचे प्रमाण मोठे असल्याने शेकडो कुटुंबे अद्यापही मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांनी राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतजमिनीतील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतजमिनीवर गाळ साचल्याने पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पूरग्रस्त कुटुंबांना शासनाने तातडीने मदत करून पुनर्वसनाची व्यवस्था करावी, अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे.