cold returned : थंडी परतली

cold returned : डिसेंबरच्या अखेरीस घटलेल्या थंडीने आता पुन्हा ‘कमबॅक’ केल्यावर नाशिकच्या किमान तापमानात एका दिवसात तीन अंश सेल्सियसने घट झाली आहे. शुक्रवारी शहरात राज्यातील सर्वात नीचांकी तापमान नोंदवण्यात आले. शहराचा पारा १२ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककरांना हुडहुड भरली. आर्द्रता ९८ टक्क्यांपर्यंत असल्याने पहाटेपासून सकाळी दहापर्यंत शहराने धुक्याची दुलई पांघरल्याचा प्रत्यय आला.
अवकाळी पावसामुळे डिसेंबरच्या सुरुवातीला नाशिककरांना दमटपणा व उकाडा सहन करावा लागला. अखेरीस मात्र तापमान पुन्हा घसरले. परंतु, जानेवारीच्या सुरुवातील ढगाळ वातावरणामुळे तापमान १५ ते १६ अंशांपर्यंत असल्याने काहीसा उकाडा व गारठा जाणवत होता. आता उत्तर भारतात पश्चिम हिमालयीन क्षेत्रामध्ये पश्चिमी प्रकोपामुळे थंडी पुन्हा वाढली आहे.
शुक्रवारी (दि. ५) नाशिकमध्ये १२.८ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. महाबळेश्वर १५.३, नागपूर १५.५, मालेगाव १६.५ व मुंबईत १९.५ अंश सेल्सियस किमान अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, डिसेंबरमध्ये मिग्जॉम वादळाचा फटका राज्याला बसला होता. त्यानंतर ढगाळ वातावरण कायम राहिले. तर आता पश्चिमी विक्षोपामुळे उत्तरेकडे थंडीमध्ये वाढ होत आहे.
गतवर्षी अवकाळी पावसामुळे थंडीचा cold प्रवास काहीसा लांबला असला, तरी पुढील टप्प्यात कडाक्याची थंडी राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. शहरासह ग्रामीण भागात वाढत्या थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेतला जात आहे. राज्यातील काही भागांत पुढील दोन दिवसांत पारा आणखी दोन अंशांनी घसरण्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने व्यक्त केला आहे