पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरु झाल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यावर आता अजित पवार यांनीच याविषयी पुण्यातील एका पत्रकार परिषदेत बोलतांना खुलासा केला आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केला नाही. अर्थमंत्री म्हणून मी विकास कामांचा, प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो. याबाबत तुम्हाला काय त्रास आहे? असा प्रश्न आता अजित पवार यांनी विचारला आहे.
अजित पवार म्हणाल की, मी या राज्याचा अर्थमंत्री म्हणून कामांचा आढावा घेऊ शकतो. फायनल निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच असतो. पण काहींनी वेगळ्याच बातम्या चालवल्या. हे असं झालं, ते तसं झालं, अरे तुम्हाला काय त्रास होतो? जर राज्याचे प्रश्न, मेट्रोचे प्रश्न मार्गी लागत असतील तर काय अडचण आहे? यंत्रणा हलवली की कामं मार्गी लागतात असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी आज आढावा घेतला तरीही मुख्य निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाच असणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा. तुम्ही काम रखडलं तर सांगा, आम्ही लक्ष देऊ, राज्याचा विकास होणं आवश्यक आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर या कामांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्याचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत असतात. राधेश्याम मोपलवार यांच्याकडे या समितीची जबाबदारी आहे. आम्ही सरकार मध्ये जाण्याचं कारणच हे होतं की महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. हे सगळं करत असताना देशपातळीवर आम्ही मोदींना पाठिंबाही दिलेला आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.