मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याचा दावा केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की, खात्याचा संबंध नसताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वॉर रूममध्ये राज्यातील प्रोजेक्टचा आढावा घेतला. त्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. त्याचा फायनान्स विभागाचा काही संबंध नसतो. म्हणजे वॉररूममध्ये कोल्डवार सुरू झाला आहे. तो कोल्ड वॉर कुठल्या दिशेने गेलाय हे कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहिलं असेल, असा गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
दरम्यान, सत्ताधारी पक्षातून या कोल्ड वॉरवरून सारवासारव सुरू केली आहे. विजय वडेट्टीवार सध्या राज्याचे नवीन विरोधी पक्षनेते बनलेले आहेत. त्यामुळे आपलं वजन बनवण्याकरता दुसऱ्यांवर त्यांना टीका करावीच लागते. पूर्वी महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना फोन करत नव्हते. परंतु आत्ताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममध्ये उपमुख्यमंत्री बैठका घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवताना पाहायला मिळत आहेत, असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
राज्यात कोणतंही कोल्ड वॉर नाही. असा कुठलाही कोल्ड वॉर नाही. राज्याच्या विकासासाठी तीन पक्ष एकत्रित काम करत आहेत. आम्ही आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढणार आहोत. त्यासाठी कमिटी स्थापन करून जागावाटप आणि इतर चर्चा होईल, असं शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं.