जळगाव । गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे जळगाव जिल्ह्यात रात्रीचा पारा १९ अंशावर वाढला होता. मात्र आता अवकाळीचा ढग निवळले असून नवीन वर्षाच्या आगमनासह जळगाव थंडीचे जोरदार पुनरागमन होणार आहे. येत्या काही दिवसात रात्रीचा पारा ७ ते ८ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
खरंतर वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल होऊन, जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यासह ढगाळ वातावरणामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होऊन, जिल्ह्यातील थंडी गायब झाली होती. गेल्या आठवड्यात रात्रीचा पारा १९ अंशावर पोहोचला होता. मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून किमान तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, नव्या वर्षाची सुरुवात गुलाबी थंडीने होणार आहे. येत्या काही दिवसात रात्रीच्या तापमानात सध्या असलेल्या तापमानाच्या तुलनेत ७ ते ८ अंशाची घट येण्याचा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात सोमवारी किमान पारा १६ अंशावर होता. त्यामुळे रात्रीही काही प्रमाणात गारवा जाणवला.आज मंगळवारी काही अंशी किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.