जळगाव जिल्ह्यात १९ ते २४ जानेवारीदरम्यान पहाटे थंडीचा जोर वाढून किमान तापमान १२ ते १४ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कडाक्याची थंडी कमी झाली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून थंड वाऱ्यांमुळे पहाटे आणि रात्री गारवा वाढल्याचे जाणवत होते. दरम्यान, आजपासून थंडी अधिक तीव्र होईल, तर दिवसभर उन्हाचा चटका जाणवत राहील.
हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, २३ जानेवारीपर्यंत कमाल तापमान ३२ ते ३३ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेस उकाड्याचा अनुभव येईल.
हेही वाचा : विद्येच्या मंदिरात चाललंय तरी काय ! शाळेच्या कार्यालयात शिक्षक-शिक्षिकेचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल
थंडी वाढण्यामागील कारणे
अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्याचबरोबर उत्तर भारतात वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीत वाढ होत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे तापमान घटत आहे, आणि याचा परिणाम महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातील हवामानावर होतो आहे.
गेल्या काही दिवसांत तापमानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून, नागरिकांनी बदलत्या हवामानानुसार योग्य ती खबरदारी घ्यावी, असे हवामान विभागाने सुचवले आहे.