जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कानळदा (जि. जळगाव) येथील जिल्हा परिषद शाळेस भेट दिली. यावेळी ते चक्क चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसमवेत जावून बसले. विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी गणिताचा खेळ खेळला. संख्या ओळखणे, संख्यांची बेरीज करणे, एकक, दशकाची संकल्पना समजून घेणे या खेळात त्यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला.
‘गणितासाठी १० दिवस’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देत विद्यार्थी व शिक्षक अशा दोन्ही भुमिका बजावल्या. आधी त्यांनी विद्यार्थ्यासह गणिताचे धडे गिरवीत शिक्षण घेतले. तसेच शिक्षक बनून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना गणित आणि भाषेतील कौशल्ये शिकविण्यावर भर देण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. जिल्हाधिकाऱ्यांसोबत वर्गात बसले असतांना विद्यार्थी त्यांच्या सोबत रमले होते.
शिक्षकांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी गणित महत्त्वाचे असते. चांगले जीवन जगण्यासाठी आणि चांगले माणूस बनण्यासाठी जीवनात प्रत्येकक्षणी गणितात गणित महत्त्वाचे असते. गणिताची भीती बाळगू नका, तर त्याला खेळाप्रमाणे वागवा. ज्यांना योग्य उत्तर माहीत नाही त्यांना टाळू नका, शैक्षणिक वातावरण वाढविले पाहिजे, कारण आपण सर्वजण आपल्याला जे माहीत नाही ते शिकण्यासाठी शाळेत जातो. त्यांनी चुका केल्या तर समजावून सांगता. विद्यार्थ्यांना समाजावून सांगत विषय सोपा करा.
शाळेतील सर्व भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीने वित्त आयोगातून उपाययोजना करावी. शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था पुरेसा उजेड, पुरेशी हवा. या सर्व बाबी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना आणि सरपंचांना सांगितले. येत्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे सर्व वर्ग प्रकाशमान केले असे आश्वासन पदाधिकारी यांनी दिले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील आदी उपस्थित होते.