---Advertisement---
धुळे : महाविद्यालयीन मैत्रिणीचा व्हिडीओ व्हायरल केल्याच्या संशयावरून एका १९ वर्षीय तरुणाला भरदुपारी रस्त्यावर तिघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष अरोरा (वय १९, रा. साक्री रोड, धुळे) हा एका इलेक्ट्रिक दुचाकीच्या शोरूममध्ये उभा असताना तनीष पोल (पूर्ण नाव-गाव माहीत नाही) याच्यासह दोघा अज्ञात तरुणांनी लक्ष अरोरा याला अडविले.
‘तुझ्या वर्गात शिकणारी मुलगी माझी प्रेयसी आहे आणि तू तिचा व्हिडीओ व्हायरल केला आहेस.’ या कारणावरून लक्ष अरोरा याला तिघांनी शिवीगाळ करीत हाताबुक्क्यांनी मारहाण केली.
एवढ्यावरच न थांबता त्यांनी लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. आरोपींनी जाताना, ‘तुझ्या वडिलांचे शोरूम फोडून टाकू,’ अशी धमकीदेखील दिली. लक्ष गिरीश अरोरा याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---Advertisement---