रंग माझा सावळा

मानसिकता 

मृगनयनी म्हणून शोभावे असे डोळे, नाकीडोळी चरचरीत घरकामात तरबेज, शिक्षणाने पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या श्यामलचे गेल्या दोन वर्षांपासून लग्नाचे वय झाले असले तरी स्थळ येऊनही लग्न जुळत नाही, कारण फक्त एकच ती दिसायला सावळी.

गोर्‍या रंगाचं विलक्षण आकर्षण असलेल्या आपल्या समाजात बरेच लोक गोर्‍या रंगाला सौंदर्याचे परिमाण समजतात याचे आश्चर्यच वाटते.
निळा सावळा- कृष्ण, सावळा-राम, काळा शंकर, काळा विठ्ठल यांना देव मानणार्‍या देशात सावळा रंग असणे म्हणजे सुंदर नाही असं कसं काय? हे विलक्षण कोडंच आहे. गोर्‍या मुली उजव्या, सावळ्या रंगाच्या मुली डाव्या, अशी रंगाची जाणीव त्यांना अगदी लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजविली जाते अन् या सावळ्या रंगामुळे त्यांच्या मनात बरेचदा घुसमट व नंतर न्यूनगंड निर्माण होतो. गोर्‍या रंगाविषयी असूया निर्माण होते, आपण कुठेतरी कमी तर नाही ना? ही भावना त्यांना आतल्या आत कोरत राहते. अशा मानसिकतेमुळे रंगाने सावळे मनाने गोरे पान असलेले लोक उपेक्षित राहतात. एखाद्या सावळ्या वर्णाच्या व्यक्तीला सुंदर नाही म्हणणे हे आपल्या कोत्या व कुरूप मानसिकतेचे उदाहरणच नाही का?

सौंदर्याचा पहिला निकष रंग, असंच काहीसं झालंय. आपण स्वभाव, कर्तृत्व याला काहीच महत्व देतच नाही. रंग गोरा म्हणजेच सुंदर हेच का आपले सूत्र? यापुढे आपण जातच नाही. आपला सावळा रंग समस्या आहे, असे कुठेतरी कळत-नकळत श्यामलसारख्या मुलींच्या मनात भिनत चाललंय.

तरुण मुलांच्या गोरी बायको करायच्या अट्टाहासामुळे आणि मनात भिनत गेलेल्या या गोर्‍या रंगाच्या आकर्षणामुळे श्यामलसारख्या असंख्य मुली कधी मेकअपचे थर चढवून, तर कधी फोटो एडिट सॉफ्टवेअर आणि ऍप्स वापरून ‘आपण नाही तसे’ दाखवण्याचा प्रयत्न करतात.
रंग सावळा असला म्हणून काय होतं? कर्तृत्वाने उजळ असायला नको का? अर्थातच गोरा रंग वाईट असे नाही, पण गोर्‍या रंगाच्या लोकांना मनावरची काजळी काढता येत नसली तर ते काय कामाचे? बाहेरून गोरीपान दिसणारी आतून मनाने काळीकुट्ट असलेले बरेच लोक आपण सर्वांनी पाहिले-अनुभवलेले आहेत. हे सर्व पाहून मनात आपसूक विचार येतो काळा वा गोरा तो फक्त रंग माणसा, बुद्धीवर चढलाय तुझ्या जंग माणसा.
त्वचेचा रंग हा सौंदर्याचा निकष होऊच शकत नाही. आंतरिक सौंदर्य, विचार, आचार आणि कर्तृत्व उजळ असावे असा विचार नाही का आपण करू शकत?

फिल्म इंडस्ट्रीत स्मिता पाटील नावाच्या सावळ्या मराठमोळ्या मुलीने आणि इतरही रंगाने सावळ्या असलेल्या कलाकारांनी सिने जगतात आपले नाव अमर केले आहे. पी.टी. उषासारख्या सुवर्णपर्‍यांनी तसेच आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूसारख्या विलक्षण प्रतिभावंतांनी आपल्या कर्तृत्वाने रंगालाही फिके पाडत आपल्यासोबत आपल्या सभोवतालचे विश्व पण उजळवून टाकले आहेच की, हे विसरून कसं चालेल?

अंगात गुण असले की त्यापुढे रंग, रूपाचे मानले जाणारे सौंदर्य गौण ठरते हे बर्‍याच तरुण-तरुणींने सिद्ध केलं आहे. संत चोखामेळा यांनीसुद्धा आपल्याला शिकवण दिलीच आहे ’ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा| काय भुललासी वरलीया रंगा॥ म्हणूनच गोर्‍याची सावळ्या रंगाशी तुलना न करता अंतरंगाच्या निर्मळतेला पाहू या. रंग-रुपावरून माणसाचे सौंदर्य ठरवण्यापेक्षा आत्म्याची, विचारांची समृद्धी, सद्गुण व माणुसकीचे आंतरिक उजळता लक्षात घेऊ या.

 

पंकज वसंत पाटील 

मो. नं 9850430579