मुंबई : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर झालेला नाही. कारण मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून सध्या तिन्ही पक्षात एकमत होताना दिसत नाही. मात्र बिनचेहऱ्याची महाविकास आघाडी अजिबात चालणार नाही, लोकांना चेहरा द्यावाच लागेल, अशी भुमिका खासदार संजय राऊत यांनी आग्रहीपणे मांडली आहे. लोकांनी उध्दव ठाकरेंचे काम पाहिले आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरेंचे नाव पुढे केले आहे.
खासदार राऊत म्हणाले की, उध्दव ठाकरेंकडे पाहून लोकांनी लोकसभेला मतदान केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावा लागेल, चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचे आहे. तिघांची ताकद एकत्र होती पण बिनचेहऱ्याची महाविकास आघाडी आणि बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही. लोक स्वीकारणार नाही. लोकांना चेहरा द्यावाच लागेल असं विधान त्यांनी केले आहे. यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने सावध भुमिका घेतली आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, आम्ही एकत्रित आहोत आणि महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मुख्यमंत्री कोण यावर आम्ही चर्चा करत नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत असं सांगत उद्धव ठाकरेंच्या CM पदाच्या चेहऱ्यावर भाष्य करणं थोरात यांनी टाळलं.
दरम्यान, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री कोण व्हावा याच्यात मविआच्या कुठल्याही नेत्याने स्वारस्य ठेवू नये. आम्ही सत्तेवर आले पाहिजे हे स्वारस्य ठेवले पाहिजे. मविआत निवडून आलेले आमदार कोण मुख्यमंत्री हे ठरवतील असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.