मुंबई : विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदासंदर्भात उबाठा गट येत्या दोन दिवसांत निर्णय घेऊन विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्शवभूमीवर सोमवारी महाविकास आघाडीची बैठक झाली. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावर उबाठा गट दावा करीत असल्याने त्याला काँग्रेस आणि शरद पवार गटाने तोंडी सहमती दाखवली. उबाठा गट विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदावर दावा करीत असेल, तर विधान परिषदेवर काँग्रेस पक्ष दावा करेल, अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधान परिषद विरोधीपक्ष नेतेपदाचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये पूर्ण होत आहे. त्यानंतर विरोधीपक्ष नेतेपदावर दावा केला जावा, असे उबाठा गटाकडून सांगण्यात आले. यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे सांगण्यात आले. विधान परिषद विरोधीपक्ष नेतेपदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचे नाव उबाठाने जाहीर केल्यानंतर काँग्रेस विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाचे नाव जाहीर करेल, असे सांगण्यात आले. सध्या उबाठाकडे २० आमदार, काँग्रेसकडे १६ आमदार आणि शरद पवार गटाकडे १० आमदार आहेत.
विधानसभेत ठाकरेंचे संख्याबळ अधिक आहे. विधान परिषदेचे संख्याबळ पाहता ठाकरे गट सात आमदार आणि काँग्रेसचेही सात आमदार आहेत. उबाठाच्या एका आमदाराचा कार्यकाळ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता काँग्रेस विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे पुरेसे संख्याबळ नसलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्याएवढ्या जागा जिंकता आल्या नाहीत. विधानसभा अध्यक्षांनी ठरवले, तरच विरोधकांना हे पद मिळू शकते अशी चर्चा आहे.