तरुण भारत लाईव्ह । बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमत गाठेल असे चित्र दिसत आहे. आतापर्यंत सामोर आलेल्या कलांनुसार काँग्रेसने ११५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा ७३ आणि जेडीएस २९ जागांवर आघाडीवर आहे. मतमोजणीत काँग्रेसने मोठी आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. मात्र विजय मिळवूनदेखील काँग्रेसमोरील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार की माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या? यावरुन आतापासूनच सत्तासंघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.
निकालाच्या पूर्वसंध्येला म्हणजे शुक्रवारी काँग्रेस नेत्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेतली. किती जागांवर विजय मिळू शकतो, या विषयावर बैठकीत चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी कनकपुरा येथील आपल्या घरून बंगळुरूकडे काल रात्रीच प्रस्थान केले. बंगळुरूमध्ये त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन चर्चा केली. सिद्धरामय्या काल रात्री म्हैसूर येथे जाण्यासाठी निघणार होते, मात्र त्यांना बंगळुरूमध्येच थांबण्यास सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेडीएसचे कुमारस्वामी आघाडी करण्यासाठी तयार आहेत, मात्र मुख्यमंत्रीपद कुमारस्वामी यांना मिळावे, अशी त्यांची अट आहे. मात्र ही बाब सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना खटकणारी आहे. काँग्रेसमध्ये या दोघांशिवाय जी. परमेश्वरा, एच. के. पाटील आणि आर. व्ही. देशपांडे यांच्यासारखे नेते आहेत. यापार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचा प्रचंड वेग आला आहे. यामुळे आता सत्तास्थापनेत जेडीएस काय खेळी करते? यावरच पुढील राजकीय गणितं अवलंबून आहेत.