काँग्रेसच्या बड्या नेत्याने कापला मंदिराच्या आकाराचा केक, हिंदूंच्या भावना दुखावल्याने सर्वत्र संताप

कानपूर : काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मंदिरांच्या आकाराचा केक कापल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. केक कापतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये कमलनाथ मंदिराच्या आकाराचा केक कापताना दिसत आहेत. या केकवर भगवा झेंडा आणि हनुमानाचा फोटोदेखील दिसून येत आहे. हा प्रकार हिंदूंचा अपमान असल्याचे म्हणत भाजपाकडून कमलनाथ यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

१८ नोव्हेंबरला कमलनाथ यांचा वाढदिवस आहे. छिंदवाडाच्या तीन दिवसीय भेटीवर असताना त्यांचा वाढदिवस निवासस्थानी समर्थकांकडून साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराचा केक कापण्यात आल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टीका केली आहे. हनुमानाचा फोटो असलेला केक त्यांनी कापला, हा हिंदू धर्मासह सनातन संस्कृतीचा अपमान आहे, असे चौहान म्हणाले आहेत. कमलनाथ यांनी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. कमलनाथ आणि त्यांचा पक्ष खोटे भक्त आहेत. त्यांचा देवाशी काहीही संबंध नाही. राम मंदिराला विरोध करणार्‍या पक्षाचे ते प्रतिनिधित्व करतात, अशी टीकाही चौहान यांनी केली आहे.