मोदींना पुरस्कार देणं यात हरकत काय? काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. याबाबत काँग्रेसच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे. मात्र काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी काँग्रेसच्या नेत्यांना घरचा आहेर देत पंतप्रधान मोदींना पुरस्कार देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. लोकमान्य टिळक संस्था काँग्रेस म्हणून कधी काम करत नाही. ती स्वतंत्र संस्था आहे. त्यांनी काय करावं हे काँग्रेस ठरवत नाही. मोदींना पुरस्कार देणं यात हरकत काय आहे, अशी स्पष्ट भुमिका त्यांनी मांडली आहे.

भाई जगताप माध्यमांना प्रतिक्रीया देताना म्हणाले कि, राजकीय मतभेद असू शकतात पण एकत्र यायला काही हरकत नसावी. महाराष्ट्राची वैचारिक अधोगती होतेय हे खरंय. राज्य केंद्र सरकारी कार्यक्रम असतील तर सर्व वाद बाजूला ठेवून एकत्रित यावं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असंही भाई जगताप पुढे म्हणालेत.

टिळक स्मारक संस्थेकडून दिला जाणारा यंदाचा ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणार आहे. पण टिळक स्मारक संस्थेच्यावतीनं हा पुरस्कार ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला ते रोहित टिळक हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींना पुरस्कार देण्यावरुन पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. या आक्षेबाबतच पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवलं आहे.