झारखंड : मतदानापूर्वी काँग्रेस नेत्याची गोळी झाडून हत्या झाल्याची घटना सूत्रानुसार समोर आली आहे. शनिवारी रात्री भुरकंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. रामगड विधानसभा पोटनिवडणुकीला अवघे काही तास राहिले. मात्र, पोटनिवडणुकीच्या अवघ्या काही तास आधीच काँग्रेस नेत्याची हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राजकिशोर उर्फ बिटका बौरी यांच्यावर हल्लेखोरांनी तब्बल 10 गोळ्या झाडल्या. गोळीबारात आमदार अंबा प्रसाद यांच्या प्रतिनिधीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
राजकिशोर उर्फ बिटका हे शनिवारी रात्री घराजवळील जुन्या पेट्रोल पंपाजवळ उभे होते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी अचानक येऊन त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी प्रथम नेत्याच्या पायावर गोळी झाडली, त्यामुळं ते खाली कोसळले. त्यानंतर गुन्हेगारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
राजकिशोर यांच्या डोक्यात, छातीत आणि पोटात गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या लागल्यानंतर काँग्रेस नेत्याला जखमी अवस्थेत स्थानिक रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेचा संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.