नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ साली १५६ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. या खटल्याची सुनावनी पूर्ण झाली असून केदार आणि पाच जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य तिघांची सुटका करण्यात आली आहे. लवकरच शिक्षा सुनावली जाणार आहे.
१९९९ साली सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकचे अध्यक्ष झाले. बँकेच्या रकमेतून २००१-०२ मध्ये होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स .लि. आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकारी प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या. सहकार विभागाचा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही रक्कम गुंतवण्यात आली होती. पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते.
सुनील केदार, बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेव चौधरी, तत्कालीन मुख्य हिशेबणीस सुरेश दामोदर पेशकर (नागपूर), रोखे दलाल केतन कांतीलाल सेठ, सुबोध चंदादयाल भंडारी, नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित सीतापती वर्मा (अहमदाबाद), महेंद्र राधेश्याम अग्रवाल व श्रीप्रकाश शांतीलाल पोद्दार (कोलकाता) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पूरकर शुक्रवारी खटल्याचा निकाल सुनावला. यात केदार यांना दोषी ठरविण्यात आले आहे. किती शिक्षा सुनावली जावी यावर आरोपी पक्षा च्या वकिलांकडून युक्तिवाद केला जात आहे. तो पूर्ण होताच शिक्षा सुनावली जाईल. यात सुनील केदार, अशोक चौधरी, केतन सेठ, सुबोध गुंडारे, नंदकिशोर त्रिवेदी, अमोल वर्मा यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे तर श्रीप्रकाश पोद्दार, सुरेश पेशकर, महेंद्र अग्रवाल यांना निर्दोष ठरविण्यात आले आहे.