काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट ; वाचा काय घडले

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. रमेश चेन्नीथला यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जावून शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर रमेश चेन्नीथला यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“मी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी बनल्यानंतर आज मी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासोबत आम्ही शरद पवार यांची भेट घेतली. आम्ही महाविकास आघाडीबाबत त्यांच्यासोबत बातचित केली आहे. आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जागावाटप आणि इतर गोष्टींबाबत आज चर्चा केली”, अशी माहिती रमेश चेन्नीथला यांनी दिली.

“ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील आम्ही बातचित केली आहे. आम्ही लवकरात जागावाटप निश्चित करु. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाबाबतही चर्चा झालीय. शरद पवार यांच्यासोबत चांगली चर्चा घडून आली. जवळपास दोन तास चर्चा झाली. आम्ही विस्तारात चर्चा केली आहे. येत्या काळात महाविकास आघाडीचा कार्यक्रम सुरु होईल. आम्ही सर्व एकत्रितपणे काम करु”, असं रमेश चेन्नीथला म्हणाले.