काँग्रेस जिथून जाते, तिथे त्यांना सत्तेत परतणे कठीण

कांगडा : आता काँग्रेसचे सरकार फक्त २ राज्यांमध्ये उरले आहे. काँग्रेस जिथून जाते, तिथे त्यांना सत्तेत परतणे कठीण आहे,’ असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. यासोबतच, काँग्रेसवर आतापर्यंत केवळ लुटमारीचेच काम केले, तर भारतीय जनता पक्षाने राजकीय कार्यपद्धती बदलून कामावर लक्ष केंद्रित केले आणि विकासाची कामे केली, असे विधानही पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आज २१व्या शतकात हिमाचल विकासाच्या टप्प्यावर आहे. त्यांना स्थिर आणि मजबूत सरकारची गरज आहे. जेव्हा हिमाचलमध्ये मजबूत सरकार आणि दुप्पट सामर्थ्य असेल, तेव्हा ते आव्हानांवर मात करतील आणि तितक्याच वेगाने नवी उंची गाठतील. हिमाचल भाजपचे लोक शुभ संकल्प करून येथील विकासाला नव्या उंचीवर नेतील. यावेळी उत्तराखंडच्या जनतेनेही जुनी परंपरा बदलून भाजपला विजय मिळवून दिला.

उत्तर प्रदेशातही ४० वर्षांनंतर एखादा पक्ष पुन्हा जिंकला आणि पूर्ण बहुमताने सलग दुसऱ्यांदा सरकारमध्ये आला. मणिपूरमध्येही पुन्हा भाजपचे सरकार आले आहे. त्यामुळे लोकांचा भाजपावर विश्वास असल्याचे स्पष्ट झाले आहे,” असेही त्यांनी नमूद केले. “कांगडा ही भूमी शक्तीपीठांची भूमी आहे. हे भारताच्या श्रद्धा आणि अध्यात्माचे तीर्थक्षेत्र आहे. बैजनाथ ते काठगढपर्यंत या भूमीत बाबा भोलेंची असीम कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहते.

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार

‘काँग्रेस हिमाचलला स्थिर सरकार कधीच देऊ शकत नाही आणि देऊ इच्छित नाही. त्यांची फक्त दोन-तीन राज्यात सत्ता उरलीये. काँग्रेसच्या राज्यातून कधी विकासाच्या बातम्या येतात का? फक्त भांडणाच्या बातम्या येतात. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजे विकासातील अडथळा. घराणेशाही, हाच काँग्रेसचा आधार आहे. असे सरकार कधीच विकास करू शकणार नाही,’ अशी घणाघाती टीका पीएम मोदींनी केली.