मणिपूरपेक्षा स्वत:च्या राज्यात काय चाललंत ते पाहा, काँग्रेसने केली मंत्रीपदावरुन हकालपट्टी

जयपूर : मणिपूरमध्ये दोन जमातींमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची काढण्यात आलेली धिंड याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र राजस्थान सरकारमधील मंत्री राजेंद्र गुढा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारची कोंडी केली आहे. त्यावर अशोक गहलोत यांनी अवघ्या सहा तासांमध्ये राजेंद्र गुढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली.

आपण मणिपूर ऐवजी आपल्या राज्यात काय चाललं आहे, हे पाहिलं पाहिजे. आपण महिलांना संरक्षण देण्यात अपयशी ठरलो आहोत, असं विधान गुढा यांनी राजस्थान विधानसभेत केलं. या वक्तव्याचं विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं स्वागत केलं. मात्र या वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर अशोक गहलोत यांनी अवघ्या सहा तासांमध्ये राजेंद्र गुढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली.

आता महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजेंद्र गुढा चर्चेत आले आहेत. स्वत:च्याच सरकारवर केलेल्या टीकेमुळे गुढा यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसने ही अनुशासनात्मक कारवाई असल्याचा दावा केला आहे. तर भाजपा आणि विरोधी पक्षांनी राजेंद्र गुढा यांना खरं बोलण्याची शिक्षा दिली गेल्याचा आरोप केला आहे.